जळगाव प्रतिनिधी | शहरातील एमआयडीसी परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. कंपनीतून चोरीला गेलेल्या शिशाच्या धातूच्या विटांसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली असून, या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कंपनीच्या सिमेंट कंपाउंडला लावलेले पत्रे कापून आत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीत ठेवलेल्या शिशाच्या धातूच्या विटा चोरून नेल्या. चोरीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. बारकाईने तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या कारवाईत ३२० किलो वजनाच्या शिशाच्या धातूच्या विटा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केली.



