अमळनेर प्रतिनिधी | गांधलीपुरा भागात एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजेश उर्फ दादू धोबी याला अमळनेर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रवींद्र उदेवाल (वय २८, रा. राजाराम नगर, शिरूड नाका) हा गांधलीपुरा भागातून पायी जात असताना अचानक दादू धोबी त्याच्या समोर आला. त्याने अश्लील शिवीगाळ करत, “तू पोलिसांचा खबरी आहेस, तुझ्यामुळे मला त्रास होत आहे,” असे म्हणत कमरेला लावलेला कोयता बाहेर काढला आणि परेशवर वार करण्याचा प्रयत्न केला.
परेशने तेथून पळ काढल्यानंतर दादूने त्याचा पाठलाग केला. भरुचा वाईन शॉपजवळ त्याला अडवून मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परेशने प्रसंगावधान राखत वार चुकवला आणि आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावत आले आणि त्यांनी परेशची सुटका केली.
यावेळी दादूने नागरिकांवरही कोयता उगारून धमक्या दिल्याचे सांगण्यात आले. संतप्त नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली.
परेश उदेवाल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात राजेश उर्फ दादू धोबी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.



