जळगाव प्रतिनिधी | शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव समिती तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली. शिवतीर्थ मैदान येथून पाहणीला सुरुवात करून मुख्य बाजारपेठेसह मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान विविध गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महावितरण कंपनी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी, वाहतुकीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मिरवणुकीच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या महावितरण कंपनीच्या विद्युत तारा, उघड्यावर पडलेल्या डीपी तसेच रस्त्यावर असलेले खड्डे आणि इतर अडथळ्यांची पाहणी करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील अरुंद ठिकाणे, विद्युत व्यवस्था आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींची नोंद यावेळी करण्यात आली.
तसेच मिरवणुकीच्या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग, वाहतूक वळविणे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन दलाला मार्ग उपलब्ध करून देणे, याबाबतही नियोजनावर चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मार्गाची पाहणी करून संभाव्य अडचणी आधीच दूर करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याने यंदाची विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज होत असल्याचे पाहायला मिळाले.



