जळगाव प्रतिनिधी | केळी पिकाच्या विम्याची रक्कम मिळत नसल्याने जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
अनेक दिवसांपासून विम्याच्या रकमेसाठी पाठपुरावा करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केळी पिकाच्या नुकसानीनंतर विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नाकारण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विशेष म्हणजे, दावे नाकारण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत विम्याची रक्कम रखडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनस्थळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रलंबित विमा रक्कम तातडीने खात्यावर जमा करण्याची मागणी केली. तसेच, विम्याबाबत ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला.
दुसरीकडे, पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रलंबित रकमेबाबत कार्यवाही सुरू असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.



