जळगाव : शहरात अवघ्या दहा दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाला निर्जनस्थळी बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ९३ आणि बाल न्याय अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गिरणगाव पिंपळा रेल्वे पुलाजवळ, आजादनगर पिंपळाकडे जाणाऱ्या सार्वजनिक कच्च्या रस्त्याच्या बाजूला हे अर्भक आढळून आले. परिसरात मृत जनावरे टाकली जात असल्याने ही जागा बालिकेसाठी अत्यंत धोकादायक होती. अर्भकाच्या अंगाला मुंग्या लागत असल्याचे लक्षात येताच शिवाजी मधुकर गायकवाड यांनी तत्काळ बालिकेला स्वतःकडे घेत तिची काळजी घेतली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
या चिमुकलीची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्त भेट दिली. बालिकेच्या प्रकृतीची व पुढील देखभालीची माहिती घेऊन आवश्यक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रसंगावधान राखून बालिकेला मदत करणारे ३५ वर्षीय शिवाजी गायकवाड यांचे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.



