धरणगाव प्रतिनिधी |
धरणगाव शहरात घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील जी.एस. नगर परिसरातील कृष्ण-गीता नगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घटनेत पाच जणांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. घरफोडीची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी घरातील कपाटांचे ड्रॉवर उघडे असल्याचे, तसेच कपडे आणि साड्या अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले.
मात्र, प्राथमिक माहितीनुसार घरातून रोकड किंवा सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनीही सतर्कता दाखवत रात्री लाठ्या-काठ्या घेऊन परिसरात लक्ष ठेवले. दरम्यान, घरफोडीच्या घटनेतील संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
पाच जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या टोळीने घरफोडी नेमक्या कोणत्या उद्देशाने केली आणि यामागे आणखी काही गुन्हेगारांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



