जळगाव प्रतिनिधी | नद्यांमधील पाण्याची पातळी कमी होताच जिल्ह्यात वाळू चोरीच्या हालचाली वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी सतर्कता वाढवली असून, अवघ्या दोन दिवसांत वाळूसंदर्भात ११ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
पोलिसांनी भडगाव, कासोदा, जळगाव तालुका आणि एरंडोल परिसरात विविध ठिकाणी कारवाई केली. भडगाव तालुक्यातील वाक येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अनुक्रमे दोन कोटी आणि ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कासोदा परिसरातील जानफळ येथे नऊ लाख रुपयांचा, तर उतराण येथे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकर येथेही पोलिसांनी सलग कारवाया केल्या. या ठिकाणी नऊ लाख, नऊ लाख, आठ लाख, सात लाख, पाच लाख आणि सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एरंडोल तालुक्यातील रावंजे येथे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध वाळू उपशावर पोलिसांची नजर
जिल्ह्यातील नद्यांमधून अवैधरीत्या वाळू उपसा आणि वाहतूक होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दोन दिवसांत दाखल झालेल्या ११ गुन्ह्यांमुळे वाळू तस्करीविरोधातील मोहिमेला वेग आला आहे. अवैध वाळू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले.



