जळगाव प्रतिनिधी | महर्षी वाल्मिकी नगर, जैनाबाद येथे सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी रामायणाचार्य आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व आरास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पिवळा झेंडा दाखवून भव्य मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, भंगाळे गोल्डचे मालक भंगाळे दादा, नगरसेवक नीलू आबा तायडे, मोगली बाबा, कैलास आप्पा सोनवणे, हिरालाल दादा सोनवणे, मंडळाचे मार्गदर्शक भगवान भाऊ तायडे, किशोर बाविस्कर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी यांच्या विचारांचा प्रसार, त्यांच्या कार्याचे स्मरण आणि समाजात एकतेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी महर्षी वाल्मिकी तरुण सांस्कृतिक मित्र मंडळाचे विशेष मार्गदर्शन लाभले. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जयंती सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला.



