रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वनरक्षकाला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जगदीश काशिनाथ जगदाळे असे कारवाई करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे वन विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील एका तक्रारदाराला मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहून नेण्याची परवानगी मिळाली होती. या कामासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने गाळ काढण्याच्या मोबदल्यात संबंधित वनरक्षकाने २० हजार रुपये मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच, परिचित व्यक्तीच्या माध्यमातून ट्रॅक्टरने गाळ वाहतूक करण्यासाठी ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी रावेर शहरातील एका ज्यूस सेंटरजवळ सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान जगदीश जगदाळे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे शासकीय कामांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



