जळगाव प्रतिनिधी | रस्त्यावर पाणी सांडल्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलीला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील वाघनगर परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ दौलत माळी (वय ६२, रा. वाघनगर) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते आपल्या कुटुंबासह वाघनगर परिसरात वास्तव्यास आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गल्लीतील रस्त्यावर पाणी सोडण्यात आल्याने त्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी संबंधितांकडे धाव घेतली.
मात्र, याच कारणावरून संशयित सलीम तडवी आणि वसीम सलीम तडवी यांनी पंढरीनाथ माळी यांच्यासह त्यांच्या मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनीही त्यांना मारहाण केली. एवढेच नव्हे, तर ‘तुम्हाला पाहून घेऊ’, अशी धमकीदेखील दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पंढरीनाथ माळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहेत.



