जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी करण्यास केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी असून, पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उमेदवारी आणि जागावाटपाचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत हे दोन्ही नेते निर्णय घेतील. प्रत्येक पक्षाचा उमेदवार उमेदवारीसाठी आग्रही असतो. माझ्याकडेही निवडून येण्याइतकी मते आहेत. त्यामुळे पक्ष याबाबत निश्चित विचार करेल, असा विश्वास रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुक्ताईनगरची जागा भाजपला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी गोशाळा उपक्रमाचेही कौतुक केले. सुनील भाऊ यांनी जवळपास १,४०० गोवंशीय जनावरांचे संगोपन करून सामाजिक आणि पुण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. हिंदू संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, गोसेवेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमधील छटपूजेच्या व्यवस्थेबाबत बोलताना, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मुक्ताईनगरमधील राजकीय वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना संबंधित व्यक्तीला आपण अधिक महत्त्व देऊ इच्छित नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष टीकाही केली.



