जळगाव (प्रतिनिधी) : उत्तर भारतीय समाजाच्या प्रमुख धार्मिक सणांपैकी एक असलेल्या छठ पूजेचा उत्साह जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात पाहायला मिळाला. मेहरुण तलावावरील गणेश घाट येथे उत्तर भारतीय छठ पूजा संघातर्फे छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत पारंपरिक पद्धतीने छठी मातेची आणि सूर्यदेवाची आराधना केली.
छठ पूजेच्या निमित्ताने गणेश घाट परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांसह पुरुष आणि लहान मुलांनीही पूजेत सहभाग घेतला. व्रतस्थ महिलांनी तलावाच्या पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले. कुटुंबाचे सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सूर्यदेवाकडे प्रार्थना करण्यात आली.
छठ पूजा हा सूर्यदेव आणि छठी मातेच्या उपासनेचा महत्त्वाचा सण मानला जातो. या व्रतामध्ये श्रद्धा, शिस्त आणि भक्तीला विशेष महत्त्व आहे. भाविकांकडून निर्जळी उपवास करून सूर्यास्ताच्या वेळी मावळत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून व्रताची सांगता केली जाते.
दरम्यान, उद्या सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी पुन्हा मोठ्या संख्येने भाविक गणेश घाटावर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उत्तर भारतीय छठ पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष ललन यादव यांनी छठ पूजेचे महत्त्व आणि उत्सवाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
उद्या उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर छठ महोत्सवाची सांगता होणार आहे.



