जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. बँकेच्या २१ जागांसाठी ४०० हून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. आतापर्यंत तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १८ जागांसाठी राजकीय संघर्ष रंगणार आहे. उद्या, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असल्याने निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत सुरुवातीलाच तीन जागांवर बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी चिमणराव पाटील आणि पत्नी मृणाल अमोल पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी भुसावळ मतदारसंघातून बिनविरोध विजय मिळवला आहे.
दरम्यान, पाचोरा मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज सुरुवातीला बाद करण्यात आला होता. मात्र, नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, जामनेर मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील रघुनाथ पाटील यांचा अर्ज अवैध ठरल्याने महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे.
मुक्ताईनगर, यावल आणि पाचोरा मतदारसंघांतील राजकीय समीकरणे अद्यापही गुंतागुंतीची आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून मतभेद असल्याचे चित्र आहे. आमदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या राजकीय गटांमध्ये उमेदवारांवरून संघर्ष निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढविणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही जागावाटपाचा निर्णय गिरीश महाजन घेतील आणि त्यांचा निर्णय मान्य असेल, असे स्पष्ट केले आहे.
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या माघारीनंतर कोण मैदानात राहणार आणि महायुतीचे जागावाटप कसे होणार, हे स्पष्ट होईल. २९ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर कोणत्या राजकीय गटाचे वर्चस्व निर्माण होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



