धरणगाव प्रतिनिधी | नुकताच विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या उत्साहात माहेरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास क्रूझर गाडीचे चाक चालत्या प्रवासात निखळल्याने भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत २२ वर्षीय नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
लग्नाच्या आनंदावर विरजण :
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच पूजा आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्याला परतत होती. सर्वजण क्रूझर गाडीने (क्रमांक MH 30 AZ 4710) प्रवास करत होते. वापीहून अकोल्याकडे जात असताना वराड गावाजवळ अचानक गाडीचे एक चाक निखळले. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन हा भीषण अपघात झाला.
एकाच कुटुंबातील तिघांचा अंत :
या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, नववधू पूजा वागडकर हिच्यासह दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय ५२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच ज्या घरात लग्नाची सनई वाजत होती, तिथे आता आक्रोश पाहायला मिळत आहे. या घटनेने वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अकोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सहा जखमींवर उपचार सुरू :
या अपघातात प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय अंश नितेश काठोडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.



