जळगाव प्रतिनिधी | शहरातील निमखेडी रोड परिसरातील एका नामांकित रहिवासी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी २१ मे रोजी सायंकाळी मोठी कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने टाकलेल्या या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह पुरुषाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात आणि विशेषतः निमखेडी भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
‘पंटर’ पाठवून रचला सापळा :
निमखेडी शिवारातील ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे देहव्यापार चालवला जात असल्याची गोपनीय माहिती परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. त्यानुसार, पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला (पंटर) संबंधित फ्लॅटमध्ये पाठवले. पंटरने आत जाऊन संशयितांशी पैशांची बोलणी केली. तेथे कुंटणखाना सुरू असल्याची खात्री पटताच, त्याने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाला मोबाईलवर ‘मिस कॉल’ देऊन इशारा केला. इशारा मिळताच अपार्टमेंटबाहेर तैनात असलेल्या एएचटीयूच्या पथकाने तात्काळ आत धाव घेत फ्लॅटवर छापा टाकला.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू :
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई यशस्वी करण्यात आली. रहिवासी भागात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने नागरिक चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी या ठिकाणाहून दोन महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थानी हलवले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेली महिला आणि पुरुष नेमके कधीपासून हा व्यवसाय करत होते? या रॅकेटमागे आणखी कोणाचा हात आहे? आणि याचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत? याचा सखोल तपास जळगाव पोलीस करत आहेत.



