जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील माऊलीनगर, कोल्हे हिल्स परिसरात कौटुंबिक वादातून दुसऱ्या पत्नीसह तिच्या नातेवाईकांनी पतीसह त्याच्या भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी धारदार चाकूने वार करून एकाला जखमी करण्यात आले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर मोहन जयराज, रा. माऊलीनगर, कोल्हे हिल्स परिसर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आरती रमेश लोंढे असून, तिच्यावर चारित्र्याबाबत संशय घेतल्याने वाद निर्माण झाला. १६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजता हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात आरती रमेश लोंढे, विमला वसंत पवार, किरण वसंत पवार आणि कार्तिक रमेश लोंढे यांनी किशोर जयराज, त्यांचे भाऊ राहुल मोहन जयराज आणि राहुल यांची पत्नी प्रमा किशोर जयराज यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी किरण वसंत पवार याने राहुल यास जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने छातीवर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



