जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात जुन्या वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राहुल अशोक शिंदे, विजय जयवंत शिंदे आणि लखन सुनील कोळी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी कांचन नगर परिसरात क्षितीज निधाने या तरुणावर शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर हल्ल्यात सहभागी असलेले तिघेही पसार झाले होते. त्यांचा शोध घेऊन शनिपेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत अटक केली.
दरम्यान, अटक केल्यानंतर पोलिसांनी तिन्ही संशयितांची कांचन नगर परिसरातून धिंड काढली. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अशा प्रकारे धडा शिकवल्याचे या कारवाईतून दिसून आले.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. कांचन नगर परिसरात झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
हल्ल्याच्या घटनेचा पुढील तपास शनिपेठ पोलिस करीत असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील इतर बाबींचाही तपास केला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कडक पावले उचलली जात असल्याचा संदेश देण्यात आला आहे.



