जळगाव प्रतिनिधी : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसमोरील महापालिकेचे कचरा संकलन केंद्र हटविण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. गुरुवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत कचरा संकलन केंद्राजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनीही सहभाग घेत महापालिकेच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली.
शहरातील विविध भागांतून घंटागाड्यांद्वारे गोळा करण्यात आलेला कचरा शासकीय आयटीआयसमोरील या केंद्रावर आणून जमा केला जातो. मात्र, शैक्षणिक संस्थेच्या अगदी जवळच कचरा संकलन केंद्र असल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणला जात असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
कचरा संकलन केंद्रामुळे आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, महापालिकेने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हे केंद्र तातडीने हटवावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आंदोलन सुरू होताच कचरा संकलनासाठी आलेली वाहने या ठिकाणाहून निघून गेली. त्यानंतर कचरा संकलनाची प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, केवळ काही काळासाठी कचरा संकलन बंद करून प्रश्न सुटणार नसून, कायमस्वरूपी हे केंद्र हटविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन कचरा संकलन केंद्र हटविण्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी अभाविपने केली आहे. जोपर्यंत कचरा संकलन बंद होत नाही आणि आयुक्तांकडून केंद्र हटविण्याबाबत ठोस भूमिका स्पष्ट केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे शासकीय आयटीआयसमोरील कचरा संकलन केंद्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे आता विद्यार्थ्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



