वरणगाव प्रतिनिधी | आसाममधील गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या राष्ट्रीय ग्रॅपलींग चॅम्पीयनशिप २०२६ स्पर्धेत वरणगावच्या क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक नोंद झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम शाळेचा खेळाडू प्रणय संजय बावस्कर याने ६६ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आणि वरणगावसाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर ब्राँझ पदक मिळवून दिले.
ही स्पर्धा २९ मे ते ३१ मे दरम्यान गुवाहाटी येथील दिसपूरमधील भुगेश्वरी फुकोनानी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. मल्लयुद्धासारख्या असलेल्या या ‘नो-गी व गी’ प्रकारातील ग्रॅपलिंग स्पर्धेत भारतातील २४ राज्यांतील एकूण ५६७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नाशिक विभागाचे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक दुष्यंतराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा संघ २६ मे रोजी रवाना झाला होता, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून प्रणयने प्रतिनिधित्व केले. या चुरशीच्या स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या मार्टिन रोमिंगने सुवर्ण, तर केरळच्या आदित्य केशवने रौप्य पदक मिळवले, तर प्रणयने महाराष्ट्राचे नाव उंचावत कांस्य पदकावर नाव कोरले.
प्रणयचे यश वरणगावच्या इतिहासात अभूतपूर्व ठरल्याने, त्याचे आगमन झाल्यावर रेल्वे स्टेशन परिसर ते हनुमान व्यायाम शाळेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रणयला या खेळाचे प्रशिक्षण वस्ताद नामदेव मोरे, टीम कोच संजय बावस्कर आणि दिलीप संगेले यांचे लाभले.
या ऐतिहासिक यशाबद्दल चंद्रकांत बढे सर, हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुनील काळे, बाळासाहेब चव्हाण, प्रा. भागवत निकम, संजय तायडे, महेंद्र इंगळे, किरण साळवे, तसेच चाळीसगाव व तालुक्यातील सर्व कमिटी सदस्यांनी प्रणयचा जाहीर सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



