जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मनपाच्या बहुचर्चित सन २००६ मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि नवीन तयार करण्यात आलेल्या मूळ फाईली रेकॉर्ड रूममधून चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेचे नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक अमोल वसंतराव पाटील (वय ३२) यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागातील सर्व महत्त्वाचे अभिलेख आणि कागदपत्रे रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवली जातात. यामध्ये २००६ च्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील गट क्र. ३३७/३ अ/१ आणि गट क्र. ३३७/३ अ/२ या गटांच्या नवीन तयार केलेल्या मूळ फाईलींचाही समावेश होता.
३१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी या फाईल्सची वारंवार मागणी केली जात होती. मात्र, अनेक प्रयत्न करूनही त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण अभिलेख विभागात कसून शोध घेण्यात आला; परंतु या फाईल्स कुठेही आढळून आल्या नाहीत.
अखेर, ३१ जानेवारी २०२४ ते २ जुलै २०२६ या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने रेकॉर्ड रूममधून कोणाचीही परवानगी न घेता या महत्त्वाच्या फाईली चोरून नेल्याचा संशय बळावला. या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरकुल घोटाळ्यासारख्या संवेदनशील प्रकरणातील पुरावेच गायब झाल्याने जळगावात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



