अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करत तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत सखाराम महाराज वाडी हे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत, या घटनेची गंभीर दखल घेतली. नुकसानग्रस्त परिसरातील पंचनामे तात्काळ पूर्ण करून आवश्यक ती आर्थिक मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले.
तसेच संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कोणतीही दिरंगाई न करता सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. या दुर्घटनेमुळे संस्थानाचे मोठे नुकसान झाले असले, तरी शासनाच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून हे पवित्र श्रद्धास्थान पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील मदत व पुनर्बांधणीसाठी आवश्यक कार्यवाही लवकरच हाती घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



