जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलिस दलाने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २ कोटी ९६ लाख ४८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्याचे आयोजन ११ जुलै रोजी करण्यात आले असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाण्यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक आणि इतर मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा प्रभावी तपास करून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला. यात मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकली, चारचाकी वाहने, रिक्षा आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ आणि सायबर पोलिस स्टेशन यांनी या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.



