जळगाव | प्रतिनिधी : प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात परतलेल्या तरुण-तरुणीमुळे जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात मोठा गोंधळ उडाला. दोन्ही कुटुंबीय आमनेसामने आल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळात पोलिस ठाण्याच्या खिडकीची काचही फुटली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील तरुणी काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. दोघांनी परस्पर संमतीने विवाह केल्यानंतर १० जुलै रोजी रात्री ते एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले.
तरुण-तरुणी पोलिस ठाण्यात परतल्याची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीय मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला. मात्र, काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि दोन्ही गटांतील सदस्य एकमेकांवर धावून गेले. धक्काबुक्की आणि मारहाणीमुळे पोलिस ठाणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी ललित नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील पवार, पवन पवार, रुपेश ऐसी, धवल पाटील, सुनील पाटील, रवी देशमुख तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे करीत असून, पोलिस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची शहरभर चर्चा रंगली आहे.



