चोपडा प्रतिनिधी | ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गलगणी ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर गलगणी शिवारातील पोलिस चौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाने संशयावरून दुचाकीची तपासणी केली असता गांजा आढळून आला.
पोलिसांच्या अहवालानुसार, रिंकेंश कुमार सुरेश माधवे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा, याच्या ताब्यातून हिरव्या रंगाचा गांजा तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये गांजा, बजाज पल्सर मोटारसायकल आणि मोबाईलचा समावेश आहे.
जप्त दुचाकीचा वापर गांजा वाहतुकीसाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचा स्रोत, वाहतुकीचा मार्ग आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.



