पारोळा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी बुद्रुक येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला. यामध्ये ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १२ भार वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरी झालेल्या ऐवजाची एकूण अंदाजित किंमत एक लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
२५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.
घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून, चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



