जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत अवैध धंदे, दारूविक्री, जुगार, अमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत अवैध गावठी दारूविक्रीप्रकरणी १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी १२ गुन्हे नोंदवण्यात आले. जुगार कायद्यान्वये ४६ गुन्हे दाखल करून ६० जणांवर कारवाई करण्यात आली. शस्त्र अधिनियमानुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच अमली पदार्थविरोधी कारवाईत ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
याशिवाय हरविलेल्या १७ महिला, पुरुष, मुली व मुलांचा शोध घेण्यात आला. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून चोरीचे व हरविलेले ४२ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
या विशेष मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.



