जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आज, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी तब्बल ४०० हून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीला राज्याच्या राजकारणातही महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्यासारखे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा या मतदारसंघांतील जागांबाबत एकमत झालेले नाही. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्या, मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आज उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या मैदानात कायम राहणार, हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, २९ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



