भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय तारकेश विशाल झोपे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २४ एप्रिल रोजी सकाळी तारकेश शाळेत जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमांची तीव्रता इतकी होती की त्याच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला त्याच्यावर जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे भुसावळातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भिरूड कॉलनी, रिंग रोड, म्हाडा कॉलनी, गणेश कॉलनी आदी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान, हा हल्ला नारायण नगरातील प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्याने केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर नगरपरिषद कर्मचारी दीपक बारसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधितांच्या घरातून पाच कुत्री जप्त केली. संतप्त नागरिकांनी दोषींवर कारवाई, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, नसबंदी मोहीम आणि शहर स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



