जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील जिजाऊनगर परिसरात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेडरूममधील कपाटातील लॉकर चावीच्या साहाय्याने उघडून चोरट्यांनी तब्बल ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. चोरी झालेल्या ऐवजाची किंमत १ लाख १२ हजार ५०० रुपये असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरणा पंपिंग रोडवरील सावखेडा शिवारात असलेल्या जिजाऊनगर परिसरात ही घटना घडली. संबंधित फ्लॅट बंद असल्याची संधी साधत संशयित चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेला लॉकर चावीच्या साहाय्याने उघडला. लॉकरमधील सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, कानातील दागिने आणि इतर सोन्याचे अलंकार असा एकूण ७२ ग्रॅम वजनाचा ऐवज चोरून नेला.
घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, या घरफोडीतील संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस हवालदार धनराज पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. बंद फ्लॅट फोडून झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



