वरणगाव प्रतिनिधी | भुसावळ, वरणगावसह परिसरात शनिवारी १४ नोव्हेंबर सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास अचानक धक्के जाणवल्याने घरातील वस्तू हलू लागल्या. त्यामुळे अनेक नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सुखपुरी परिसरात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के जळगाव जिल्ह्यातील विविध भागांत जाणवल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळ आणि वरणगाव परिसरातील नागरिकांनीही धक्के जाणवल्याचे सांगितले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट पसरली. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
*प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचे आवाहन*
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. तहसीलदार नीना लबडे यांनी नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी आणि पुन्हा धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन केले.
दरम्यान, वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अग्निशमन वाहनातून ध्वनिक्षेपकाद्वारे शहरात सूचना दिल्या. नागरिकांनी सतर्क राहावे, अफवा पसरवू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



