अमळनेर जितेंद्र कोतवाल | राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. आमदार अनिल पाटील यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
अनिल पाटील म्हणाले की, अजितदादा हयात असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार त्यांच्या पक्षाच्या पातळीवर घेतील, तर आमच्या पक्षाकडून अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील. त्या जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.
विलिनीकरणाबाबतची चर्चा नेत्यांच्या पातळीवर झाली असेल; मात्र ती आमदारांपर्यंत कधीच पोहोचली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीतील भेट ही जुन्या सहकाऱ्यांची भेट होती. त्याचा विलिनीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही दोन गट नसून सर्व आमदार एकसंघ आहेत. आमचे निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले जातात. माध्यमांमधून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे, यासाठी जो कोणी मदत करेल, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही अनिल पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना त्यांनी पुन्हा एकदा पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.



