जळगाव प्रतिनिधी | शहरातील रेमंड चौफुलीसमोर एका भरधाव व बेदरकारपणे धावणाऱ्या ट्रकने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटून एका उभ्या असलेल्या मोटरसायकलवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले सुकदेव सेनु सावकारे (वय ५६ वर्षे) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-१९, CW-११३८) चालवून उदरनिर्वाह करतात. २८ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते जळगाव ते संभाजीनगर रोडने जात असताना, रेमंड चौफुली समोरील हॉटेल स्कॉच अँड सोडा जवळ त्यांनी उजव्या बाजूला वळण घेतले. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने (क्र. MH-२१, BH-७१११) रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अतिवेगाने व निष्काळजीपणाने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की, रिक्षा थेट रस्त्याच्या बाजूला उलटली आणि तेथे पार्क केलेल्या एका दुचाकीवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षा चालक सुकदेव सावकारे यांच्यासह अन्य काही जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच आरोपी ट्रकचालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला. या प्रकरणी जखमी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.



